रत्नागिरी:- अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा तडाख कोकण किनारपट्टीला बसणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 14 ते 18 या कालावधीत मुसळधार पावसासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, तसेच नागरिकांनीही सतर्क रहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर 16 मे रोजी चक्रीवादळात होणार आहे. या वादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे. वादळामुळे मुसळधार पावसासह विजेचा कडकडाट आणि वेगवाने वारे वाहणार आहेत. वादळ जसजसे पुढे सरकत राहील तशी त्याची तिव्रता वाढणार आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात 14 ते 15 मे या कालावधीत तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ खोल समुद्रातून पुढे सरकत जाणार असले तरीही त्याच्या कक्षेत कोकण किनारपट्टीचा बहूतांश भाग येणार आहे. त्यामुळे 16 ते 18 मे या कालावधीत बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढेल आणि 12 ते 42 किलोमीटर प्रती तास इतक्या वेगाने वारे वाहतील. वादळापुर्वीची स्थिती सध्या कोकणात आहे. रत्नागिरीत दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. दिवसभर हलका वाराही वाहत होता.
गतवर्षी जुनच्या पहिल्याच तारखेला निसर्ग वादळाने जिल्ह्यात थैमान घातले. दापोली, मंडणगड या दोन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला होता; परंतु जिल्हा प्रशासनाने धोकादायक भागातील लोकांना स्थलांतरीत केल्यामुळे जिवीत हानी झालेली नव्हती. यंदा मे महिन्याच्या मध्यात धडकणार्या या वादळाला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायचे यावर जिल्हाधिकारी यांनीही आढावा घेतला असून तशा सुचना अपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिलेल्या आहेत.
वेगवान वारे वाहणार असल्यामुळे समुद्र खवळणार आहे. या परिस्थितीत मच्छीमारांना धोका पोचू नये म्हणून सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. निसर्ग वादळात आंबा, काजू बागायतदारांना मोठा फटका बसला होता. यंदा हंगामाच्या अंतिम टप्प्यात वादळ घोगावत असल्याने शेवटचा माल गमावण्याची वेळ येणार आहे. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे आधीच बागायतदार त्रस्त आहे. त्यात वादळाची भर पडणार आहे.