सात तास रांगा लावून देखील लस काही मिळेना!

दुसऱ्या डोससाठी मेस्त्री हायस्कुल केंद्रावर झुंबड 

रत्नागिरी:- 45 वर्षांवरील पहिली लस घेतलेल्या नागरिकांसाठी मंगळवारी दुसऱ्या डोसचे नियोजन करण्यात आले होते. दुपारी 3 ते 6 या वेळेत डोस मिळणार असताना सुद्धा सकाळी 8 वाजल्यापासूनच नागरिकांनी मेस्त्री हायस्कुल केंद्रा बाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. अवघे एकच लसीकरण केंद्र असल्याने दुपारी 2 वाजेपर्यंत या केंद्राबाहेर तौबा गर्दी झाली. सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला. अखेर पोलीस कुमक बोलवावी लागली. मात्र नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलीस बळ देखील अपुरे ठरल्याचे दिसून आले. 
 

45 वयोगटावरील नागरिकांना मेस्त्री हायस्कूल येथे दुसऱ्या लसीचे नियोजन करण्यात आले होते. अनेक दिवसांपासून दुसऱ्या डोसकरीता नागरिक वाट पाहत होते. मंगळवारी दुपारी 3 ते 6 या वेळेत मेस्त्री हायस्कुल या ठिकाणी 45 वर्षावरील नागरिकांना डोस देण्याचे जाहीर करण्यात आले. 3 वाजता लसीकरणासाठी 3 नंबर गेट उघडण्यात येईल असे प्रशासनाने जाहीर केलेले असताना देखील नागरिकांनी सकाळी 8 वाजल्या पासूनच मेस्त्री हायस्कुल बाहेर तळ ठोकला. दुसरा डोस असल्याने पूर्वनोंदणी नव्हती. त्यामुळे नागरिकांनी सकाळपासून केंद्रावर गर्दी केली. काहींच्या नातेवाईकांनी तर काहींनी स्वतः हजर राहत लस मिळवण्यासाठी नंबर लावला. हळूहळू गर्दी वाढू लागल्याने गेट क्रमांक तीनवर काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामध्ये नागरिक पाच तासांपेक्षा अधिक काळ लसीकरण केंद्रा बाहेर उभे होते. लसीकरण केंद्राबाहेर प्रचंड गोंधळ आणि गर्दीचे वातावरणात होते. 220 डोस उपलब्ध होणार होते आणि प्रत्यक्षात 500 पेक्षा अधिक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी हजर असल्याने मोठा गोंधळ उडाला. गर्दी झाल्याने सोशल डिस्टनसिंगचा देखील पुरता बोजवारा उडाला. 

अखेर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आले. दुपारी दोन वाजल्यानंतर पोलीस लसीकरण केंद्राच्या ठिकाणी दाखल झाले. नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र नागरिकांनी गेटबाहेर मोठा गोंधळ घातला. अखेर तीन वाजता गेट उघडण्यात आला. ज्या नागरिकांना टोकन मिळाले त्या पहिल्या 210 जणांना लस देण्यात आली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरणाचे काम सुरू होते.