शहरात लसीकरण केंद्रांवर नागरिकांची फरफट; नियोजनाचा अभाव

रत्नागिरी:- शहरात लसीकरण केंद्रांवर नागरिकांची फरफट सुरू आहे. केंद्रावरील कर्मचार्‍यांची वागणूक अतिशय उद्धट असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. 45 वर्षांवरील नागरिकांची ऑनलाइन नोंद होत नाही. 18 ते 44 वयोगटातील लोकांची ऑनलाइन नोंद होते. शेड्यूल येऊनही त्यांना डोस मिळत नाही. नागरिक रणरणत्या उन्हात तासन्तास उभे राहतात आणि नंबर आला की लस नाही, म्हणून सांगितले जाते. असा अनुभव येथील मेस्त्री हायस्कूलसह अन्य केंद्रांवर येत असून नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. 

कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त लवकर आपण लसीकरण करून घेतले पाहिजे, अशी सर्वांची धरणा झाली आहे. लसीचा तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन नोंदणी करा. नोंदणी झाल्यानतंर आपल्याला येणार्‍या शेड्यूलनुसार तारीख, वेळ आणि केंद्राचे नाव दिले जाईल तेव्हा लसीकरणासाठी या. विनाकारण गर्दी करू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बुधवारी (ता. 5) लस उपलब्ध झाल्यामुळे लसीकरणाबाबतचे वेळापत्रकही प्रशासनाने जाहीर केले. त्यानुसार आज ठिकठिकाणी लसीकरण सुरू आहे. 18 ते 44 वयोगाटील नागरिकांसाठी मेस्त्री हायस्कूलमध्ये लसीकरण सुरू आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर शेड्यूल येते. परंतु त्यांनाही केंद्रावर लस दिली जात नाही. त्यामुळे नागरिक संतापले आहेत. लस मिळण्यासाठी दोन ते अडीच तास रणरणत्या उन्हात उभे राहून नंबर आला की लस मिळणार नाही असे केंद्रावर सांगितले जाते. यामुळे नागरिकांचा राग अनावर होऊन वादविवाद होऊ लागले आहेत. 45 वरील नागरिकांमध्ये फ्रंटलाईन वर्कस् आणि काही ज्येष्ठ नागरिकांना स्पॉटवर नोंदणी करून लस द्यायची आहे; मात्र त्यांनाही लस नाकारली जात आहे, अशी तक्रार आहे. त्यामुळे केंद्रांवर लसीकरणावरून गोंधळ सुरू आहे. यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून सुसूत्रता आणावी, अशी मागणी होत आहे.