जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा खोटा आदेश व्हायरल प्रकरणी दुसर्‍या आरोपीला बेड्या

रत्नागिरी:- आयएएस परिक्षा पास झाल्याचे घरातील लोकांसह गावातील व्यक्तींना भासविण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी पदी नियुक्तीची बनावट ऑर्डर काढणार्‍या अर्जुन संकपाळ रा. कोल्हापूर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केली होती. तर त्याचा साथीदार कोल्हापूर करवीर येथील फोटोग्राफर अक्षय आनंदा बुडके (29, कोथळी, कोल्हापूर) याला शहर पोलीसांनी अटक केली आहे.
 

जिल्ह्यामध्ये व्हाट्सअपच्या ग्रुपवर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांच्या बदलीचा आदेश व्हायरल झालेला होता. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांची संचालक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई येथे आणि जिल्हाधिकारी, रत्नागिरी या पदावर श्री. अर्जुन संकपाळ, भा.प्र.से. यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने शासनाकडे रुजु झाल्याने बदली झाल्याचे दर्शविण्यात आले होते. हि ऑर्डर  रत्नागिरी सहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातही व्हायरल झालेली होती.

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीसांनी अर्जुन संकपाळ याला अटक केली होती. मात्र बदलीची ऑर्डर अर्जुनच्या सांगण्यावरुन अक्षयने तयार करुन दिली होती. बदलीची जूनी ऑर्डर घेवून त्यामध्ये नावांचा बदल करुन ती अक्षयने तयार केली. अक्षय हा कोथळी, करवीर येथे प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. घरच्यांना दाखविण्यासाठी हि ऑर्डर हवी आहे. असे अर्जुनने सांगितल्यामुळे अक्षयने सहजरित्या ऑर्डर तयार करुन दिली होती. त्याला पोलीसांनी अटक केली आहे.