कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अत्यावश्यक 

गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा नवा निर्णय 

रत्नागिरी:-कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने लसीकरणासाठी केंद्रांवर सकाळपासूनच लोकांची प्रचंड गर्दी वाढू लागली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर गर्दी होती; मात्र, लसीकरणाचे अपुरे डोस असल्याने तासन्‌तास रांगेत उभे राहिल्यानंतर देखील लस न मिळाल्याने अनेकांना माघारी परतावे लागत आहे. प्रशासनाने ऑनलाईन नोंदणीशिवाय केंद्रावर जाऊ नये असे आदेश काढले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरण करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. केंद्रांवर सकाळपासून गर्दी होत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धसका घेतल्यामुळे नागरिकांच्या रांगा लागत आहेत. सध्या 45 वर्षावरील लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. सोमवारी 10 हजार 830 डोस मिळाले. कोरोनावरील लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने लवकरात लवकर लसीकरण लोकाना हवे आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भितीची छाया असून, लसीकरणाला प्राधान्य देत आहेत.

लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत असताना लोकसेवेमध्ये असणार्‍या एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांना लसीकरण अनिवार्य केले आहे. ब्रेक द चेनमध्ये दुकाने उघडायची असतील तर अत्यावश्यक सेवाकर्त्यांनाही लसीकरण किंवा कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळेही लसीकरणासाठी संख्या वाढली आहे. कोव्हिशिल्डचे डोस कमी उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेला फटका बसला आहे. मंगळवारी (ता. 20) जिल्हा शासकीय रुग्णालयात सकाळी 6 वाजल्यापासूनच लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकही रांगेत बराच वेळ उभे होते. मात्र 8.45 वाजता कोव्हिशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल. कोव्हॅक्सिन उपलब्ध नाही, असा बोर्ड लावण्यात आला. यामुळे रांगेत उभे असणार्‍या लोकांनी हंगामा केला.

दोन पध्दतीद्वारे आपण लसीकरणाच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो.
1) मोबाईल / काॅम्प्युटर च्या ब्राऊझर ओपन करून cowin.gov.in ही साईटवर जाऊन
2) मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप असेल तर त्यावर सुध्दा करता येते. याशिवाय https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकवर जाऊन पण तुम्ही ऑनलाईन नोंदणी करु शकता.