रत्नागिरी:- जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी ब्रेक द चेनचा आदेश काढला आहे. यामध्ये सकाळी 7 ते 11 या वेळेत काही अत्यावश्यक सेवेत दुकाने उघडी राहणार आहेत. 11 नंतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश असून 11 नंतर घरपोच सेवेसाठी कोरोना चाचणी आणि लसीकरण बंधनकारक असणार आहे.
सकाळी सात ते अकरा या वेळेत किराणामाल दुकाने ,भाजीपाला दुकाने ,फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, मटन, चिकन पोल्ट्री ,मासे आणि अंडी पदार्थ विक्री दुकाने, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने ही सकाळी सात ते सकाळी सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ग्रामीण भागामध्ये पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात सर्व प्रकारची किराणामाल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 या कालावधीसाठी खुली राहतील व याच कालावधीत विक्री करता येईल. इतर कालावधीत सदर दुकाने विक्रीसाठी बंद राहतील.
नगरपालिका / नगरंपचायत हद्दीमध्ये तसेच ग्रामीण भागातील ज्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त आहे, ज्या भागामध्ये शहरीकरण वाढत आहे, अशा ठिकाणी किराणा माल दुकाने, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने व इतर दुकाने ही दिवसभर बंद राहतील. त्यांना केवळ घरपोच अन्नधान्याचे व सामानाचे वितरण करता येईल. तथापि, सदर भागात भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, विक्रेत्यांसाठी त्यांच्या मालाची विक्री सकाळी 07.00 वा. ते 11.00 वा.पर्यंत करता येईल,11.00 वा. नंतर दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
तसेच रेशन धान्य दुकान, केरोसीन दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहील. तसेच होम डिलिव्हरी करणारे सकाळी सात ते रात्री आठ या वेळेपर्यंत असून घरपोच सेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण आरटीपीसीआर, अँन्टीजेन चाचणी करणे बंधनकारक असल्याचे त्याचप्रमाणे प्रमाणपत्र त्यांनी स्वतः जवळ बाळगणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय, आरोग्य सुविधा व मेडिकल दुकाने पूर्ण वेळेत सुरू राहतील.