रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना लसीचे 10 हजार डोस मिळणार

ना. सामंत यांचा पाठपुरावा यशस्वी

रत्नागिरी:– कोरोनावरील लसीचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यातील मोहीम पूर्णतः थांबलेली आहे. ही मोहीम पुन्हा सुरु होईल अशी आशा निर्माण झाली आहे. लस मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी वरीष्ठस्तरावर चर्चा केली असून जिल्ह्याला दहा हजार डोस मिळणार असल्याचे आश्‍वासन मिळाले आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना लस देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत 97 हजार लोकांनी कोविशिल्ड आणि को व्हॅक्सीन या दोन्हीचे डोस घेतले आहेत. जिल्ह्याला सुमारे एक लाख डोस मिळालेले होते. ही मोहीम सुरळीत होण्यासाठी 91 केंद्र सुरु करण्यात आली आहेत; मात्र लसच उपलब्ध नसल्यामुळे मोहीम थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. दुसरा डोस देण्यासाठी चार दिवसांपुर्वी प्राप्त झालेले 1120 डोस ठेवण्यात आले होते. त्यातील 800 डोस अजुनही शिल्लक आहेत. त्याचे वितरण पुढील डोस मिळेपर्यंत थांबवण्यात आले होते. लसीचा तुटवडा जाणवू नये यासाठी मंत्री उदय सामंत आणि विनायक राऊत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रत्येकी 10 हजार डोस मिळावेत म्हणून आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उद्या सकाळी डोस कोल्हापूर येथून रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. पुण्यातून हे डोस कोल्हापूरला येतात. तिथून वातानुकूलीत व्हॅनने रत्नागिरीत आणले जातात. ही गाडी पहाटेला रत्नागिरीतून रवाना होणार आहे. दुपारपर्यंत लस उपलब्ध होईल असे आरोग्य विभागाकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे बंद पडलेली लसीकरण मोहीम सोमवारपासून सुरु होईल अशी आशा आहे.