रत्नागिरी पालिकेला लॉकडाऊनचा फायदा

बाजारातील खोदाई सुरू ; डांबरीकरण लगेच करणार

रत्नागिरी:- विकेंड लॉकडाऊनचा फायदा उठवत पालिकेने शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी सुधारित पाणीयोजनेची नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई सुरू केली आहे. दोन ते तीन दिवसात हे काम करून लगेच नवीन रस्ते करण्याचे पालिकेचे शर्थीचे प्रयत्न आहेत; मात्र शहरात अन्य ठिकाणी रस्त्यांचा वाजलेला बोर्‍या पाहून त्याची री ओढली जाऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.  

शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुधारित पाणीयोजना आणि सीएनजी गॅसची पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. गॅस कंपनीने त्यासाठी पालिकेकडे कोट्यवधी रुपये भरले आहेत; मात्र रस्त्यांमध्ये चर खोदून त्या बुजविताना रस्ता सारखा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांची प्रचंड ओरड आहे. त्यात तांबड्या मातीचा धुरळा उडून नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत नागरिकांनी, विरोधी पक्षांनी अनेक तक्रारी केल्या. परंतु सुधारित पाणीयोजनेचे पाइप टाकून झाल्यानंतर शहरातील रस्ते करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाळा दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे तरी अजून एकही रस्ता झालेला नाही; मात्र 15 एप्रिलला शहरातील रस्त्यांचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेतून अजून पाणीयोजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम झाले नव्हते. या भागात प्रचंड वर्दळ असल्याने पालिकेपुढे पेच होता; मात्र विकेंड लॉकडाऊनमुळे पालिकेला आयती संधी मिळाली आहे. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने पालिकेने संधी साधत मारुती मंदिर, मारुती आळी, रामआळी, आठवडा बाजार आदी ठिकाणी जेसीबीने खोदाई करून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण करून रस्ते केले जाणार आहेत.