फणसोपमध्ये एकाच कुटुंबातील 12 जण कोरोना बाधित

रत्नागिरी: -तालुक्यातील फणसोप येथे एकाच कुटुंबातील तब्बल 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे गावासह आजुबाजुच्या परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये घरातील मुले, स्त्रियांसह प्रौढ, वृद्धांचा समावेश आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात रत्नागिरी तालुक्यात तब्बल 55 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यात सध्या मिनी लॉकडाऊन सुरू असुनही अशा प्रकारे लागण झालेली कुटुंबे समोर येत आहेत. यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेतही भर पडत चालली आहे. आतापर्यंत गावामध्ये सुरक्षित वातावरण असल्याचे बोलले जात होते. फणसोप येथील या प्रकरणामुळे यामध्येही दुमत निर्माण होऊ लागले आहे. गावातील लोकही आता सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. शिमगोत्सवादरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातून समुह संसर्गाचाही धोका निर्माण झाला आहे. गावातील आरोग्य उपकेंद्रांसह जिल्ह्यातील आरोग्य विभागही आता गावाकडे कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील भाग म्हणून पाहू लागल्याचे चित्र दिसत आहे.