रत्नागिरी:-उन्हाची काहीली वाढत चालली आहे. जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा सुरु झाला आहे. रत्नागिरी, खेड आणि लांजा तालुक्यात हे टँकर सुरु झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईची तेवढी तिव्रता भासलेली नाही.
यंदा उन्हाळा तीव्र राहील असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक 40 अंशापर्यंत तापमान गेले होते. सध्या पारा 34 ते 36 अंशापर्यंत वर-खाली आहे. उन्हाचा कडका वाढलेला असला तरीही टंचाईची तिव्रता ग्रामीण भागांमध्ये जाणवलेली नाही. गतवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टँकर सुरु झाला होता. यंदा उशिरापर्यंत मोसमी पाऊस सुरु होता. फेब्रुवारी महिन्यात चार दिवस पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पाणी पातळी स्थिर झालेली आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्याएवढी वेळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात आलेली नाही. खेड तालुक्यात खोपी येथे पहिला टँकर धावला. त्यानंतर रत्नागिरी तालुक्यात शिरगाव येथे विहिरींचे पाणी दुषित झाल्यामुळे टँकरने पाणी सुरु केले आहे. लांजा तालुक्यात पालू चिंचुर्टी येथे टँकरची मागणी आली होती. त्यानुसार पाणी सुरु झाले आहे.