शहरात तपासणी नाके वाढवणार; बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी बंधनकारक 

नगराध्यक्ष बंड्या साळवी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट

रत्नागिरी:- रत्नागिरीत येणार्‍या परजिल्ह्यातील व्यक्तींना कोरोनाची चाचणी बंधनकारक असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली आहे. यासाठी प्रशासन स्तरावर तपासणी नाके उभारले जातील, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनाने सर्व यंत्रणांना अलर्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शहरातील चर्मालय येथील स्मशानभूमी ही पुन्हा एकदा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे तर इतर अंत्यसंस्कार हे मिरकरवाडा स्मशानभूमीत केले जाणार आहेत.

रत्नागिरी नगर परिषदेने शहराची जबाबदारी घेतली असल्याचे सांगून शहरात फवारणी करण्यासाठी दोन टीम केल्या आहेत. या टिमना दोन वाहने उपलब्ध करून दिली असून शहराचे दोन भाग करून प्रत्येक टिमकडे एक भाग दिला असल्याचे साळवी यांनी सांगितले. दररोज शहरात या टिमकडून सॅनिटायझेशनचे काम केले जाणार आहे. तसेच सर्व सरकारी कार्यालये, जिल्हा रूग्णालये, हॉटेल्स आदी ठिकाणी सॅनिटायझेशन केले जाणार असल्याचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले.

शहरातील अपार्टमेंटमध्ये येणार्‍या बाहेरील व्यक्तींची माहिती संबंधित अपार्टमेंटमधील सदस्यांनी प्रशासनाला द्यावी. तसेच ज्या अपार्टमध्ये रूग्ण सापडतील ती अपार्टमेंट अवघ्या १५ मिनिटात सॅनिटाईज केली जाईल. यासाठी शहरवासीयांनी २३३५७६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष साळवी यांनी यावेळी केले.
शहरात विनामास्क कोणी आढळल्यास ५०० रूपये दंड आकारून नगर परिषद एक मास्क दंड भरणार्‍या व्यक्तीला देणार आहे. तसेच ज्या ठिकाणी परप्रांतीय कामगार काम करतात त्या ठिकाणीदेखील योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी यावेळी केल्या. या पत्रकार परिषदेला मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आरोग्य सभापती निमेश नायर, राजन शेट्ये, बंटी कीर, बाबा नागवेकर आदी उपस्थित होते.