रत्नागिरी:-बाजारपेठ बंदच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यापारी संघावर दडपशाहीचा प्रकार प्रशासनाने सुरू केला आहे. लॉकडाऊन विरोधात लावलेले अधिकृत बॅनर रातोरात हलवण्यात आले. एक प्रकारे सनदशीर मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा हा प्रकार असून यामुळे आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला व्यापारी वर्गाने तीव्र विरोध केला आहे. आधीच लॉकडाऊनमुळे कर्जाच्या खाईत गेलेला व्यापारी वर्ग नव्या संकटात सापडला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीला स्थानिक प्रशासनाने बगल देत नवी बाजारपेठ बंद ठेवण्याची सक्ती केल्याच्या विरोधात व्यापारी संघाने सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केले आहे.
सोशल मीडियावर लॉकडाऊन विरोधात भावना व्यक्त करताना व्यापारी महासंघाने शहरात काही ठिकाणी बॅनर लावले तसेच बुधवारी बंद दुकानाबाहेर हातात फलक घेऊन सनदशीर मार्गाने आंदोलन केले.
मात्र, व्यापाऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याचा प्रत्यय व्यापाऱ्यांना आला आहे. शहरात अधिकृत लावलेले बॅनर रातोरात काढण्यात आले आहेत. अचानक बॅनर हटवल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.