संजय लोखंडे यांना आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- सन 2019-20 च्या ग्रामपंचायत क्षेत्रातील कामगिरीच्या मूल्यमापनाच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यातील आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील ग्रामविकास अधिकारी संजय शंकर लोखंडे यांची आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कार मा. मंत्री (ग्रामविकास) यांच्या हस्ते यशवंत पंचायत अभियान पुरस्कार वितरण सोहळयाच्या वेळी वितरीत करण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड झालेल्या संजय लोखंडे यांना मा. मंत्री (ग्रामविकास) यांच्या स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 

संजय लोखंडे 2016 पासून हातखंबा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, नियमित सभा घेणे, 100% करवसुली, अहवालाचे मुदतीत सादरीकरण, योजनांची चांगल्या पद्धतीने प्रत्येक स्तरावर अंमलबजावणी, लाभार्थ्यांना मार्गदर्शन- लाभ मिळवून देणे, विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणे, बंधारे उभारणी, पाणीपुरवठा, जवाहर योजना या सर्व विभागातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.