रत्नागिरी:- जिल्ह्यातील दापोली, राजापूर, रत्नागिरी, गुहागर हे चार तालुके कासव संवर्धन करणारे तालुके म्हणून नावारुपाला येत आहेत. गेल्या दोन वर्षात ७८२७ ऑलिव्ह रिडले जातीची कासवांची पिल्ले समुद्राच्या कुशीत झेपावली आहेत. कासवांची घरटी संरक्षित करुन पिल्लांना समुद्रात सोडण्यात येत आहे.
भारतीय सागर किनार्यांवर ऑलिव्ह रिडले, ग्राईन टर्टल, हाॅक बिल, लाॅगर हेड या चार जातींची समुद्री कासवे आढळून येतात. यापैकी कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे प्रजननासाठी येतात. सरासरी २ फुट लांबीच्या या कासवांचे वजन ४० ते ४५ किलोपर्यंत असते. कासवांच्या माद्या केवळ विणीच्या हंगामातच अंडी घालण्यासाठी किनार्यावर येतात. साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा प्रजननाचा हंगाम असतो. किनार्यावर आल्यावर सुमारे ५० ते ७० मीटर अंतरावर वाळूमध्ये खड्डा खणून एका वेळेस साधारण ८० ते १५० अंडी मादी घालते.अंडी उबण्यासाठी ५० ते ५५ दिवसांचा कालावधी लागतो.
अंड्यांची चोरी, कासवांची विविध कारणांसाठी हत्या, समुद्रातील तसेच जमिनिवरील त्यांच्या अधिवासांवर होणारे मानवाचे अतिक्रमण होत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे कोकणातील कासवांचे बरेच अधिवास कायमस्वरूपी नष्ट झाले आहेत.यासाठी वन विभाग आणि निसर्गयात्री यांच्यावतीने कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.या मोहिमेत ग्रामस्थही सहभागी होतात .सन २०१६ पासून कासव संवर्धन केंद्राच्यावतीने ऑलिव्ह रिडले या कासवांच्या संवर्धनाचे काम केले जात आहे.