रत्नागिरी:- तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील माखजन येथील कबुतर मोहल्ला ते बाजारपेठ जाणार्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. त्यानंतर चाकूने तिच्यावर वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला.तसेच त्याच चाकून स्वतःवर वार करणार्या तरुणाला न्यायालयाने गुरुवारी 7 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रोशन भिमदास कदम (रा.माखजन बौध्दवाडी संगमेश्वर,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीने संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी रोशनवर भादंवि कलम 307,341 प्रमाणे गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड.विनय गांधी यांनी 12 साक्षिदार तपासले.सरकारी पक्षाचा पुरावा सबळ आहे हे ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एल.डी.बिले यांनी रोशनला 7 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.या खटल्यात तपासिक अंमलदार म्हणून एम.एम.पाटील यांनी काम पाहिले.