खेड:- मुंबई गोवामहामार्गावरील कशेडी घाटात भरधाव दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या एसटीवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेले आणखी दोघेजण जखमी झाले. हा अपघात काल(23) रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास घडला.
कशेडी टॅप येथील वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुहागर एसटी डेपोचे चालक दत्ताराम महाडिक हे आपल्या ताब्यातील एसटी गुहागर ते मुंबई अशी घेऊन निघाले होते. काल रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास त्याची एसटी कशेडी घाटातील हॉटेल अनुसया येथे आली असता भरधाव वेगात घाट उतरणारी दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येऊन एसटीवर समोरून धडकली.
या धडकेत दुचाकीचालक विजय प्रकाश जाधव (२१) रा. चोरवणे उत्तेकरवाडी हा जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेले तुषार दीपक जाधव (२१) रा. चोरवणे उत्तेकरवाडी आणि रोहित रंगराव जाधव (२०) रा भरणे तालुका खेड हे दोघेही जखमी झाले.
अपघाताची खबर मिळताच कशेडी वाहतूक शाखेचे बोडकर, त्यांचे सहकारी तसेच जगतगुरु नरेंद्र महाराज संस्थानाचे रुग्णवाहिका चालक मुकुंद मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद खेड पोलिसांनी केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.