शाळेसाठी आरक्षित जागा फिशमिल मालकाच्या घशात घालण्याचा घाट 

रत्नागिरी:- शहरातील शाळेसाठी आरक्षित असलेल्या सुमारे 20 गुंठे भूखंड एका फिशमिल मालकाच्या घशात घालण्याचा घाट रनप सत्ताधाऱ्यांकडून घालण्यात आला आहे. यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी हा आरक्षण बदलण्याचा घोळ घातला आहे. मिरकरवाड्यातील शाळा बंद करून त्या 20 गुंठ्याच्या भूखंडावतर स्थलांतरित केली जाणार होती. म्हणून भूखंडावर शाळेचे आरक्षण टाकले. मात्र आता आहे, ती शाळा विकसित केली जाणार असल्याने त्या भूखंडांवरील शाळेचे आरक्षण रद्द करून ते लघु उद्योगासाठी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.  

रनपतील शिवसेनेच्या सत्ताधार्‍यांनी त्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे या बैठकीत विरोधक विरोध करणार की तटस्थ राहणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शहरातील मिरकरवाडा येथे लघु उद्योगासाठी अनेक प्लॉट आहे. ते पालिकेने उद्योगासाठी दिले आहे. त्यापैकी चार ते सहा गुंठे मिळून सुमारे 20 गुंठ्याचे प्लॉट तेथील उद्योजकांना देण्यात आले होते. मात्र यापूर्वीच्या युतीच्या सत्ताधार्‍यांनी मिरकरवाड्यातील शाळा बंद करून ती या प्लॉटवर बांधण्याचा प्रस्ताव केला होता. त्यासाठी या भूखंडावर शाळेचे आरक्षण टाकण्यात आले. जर लघु उद्योगासाठी ते भूखंड होते तर त्यावर शाळेचे आरक्षण का टाकले. जर उद्योगासाठी होते तर मग ते का बदलले, असे अनेक प्रश्‍न आता उपस्थित होत आहेत. यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी हा भूखंड घोळ घातला आहे.

मात्र उद्या सेनेच्या सत्ताधार्‍यांनी बोलावलेल्या विशेष सभेत या भूखंडावरून जोरदार चर्चा होणार आहे. त्या भूखंडावरील शाळेचे आरक्षण उठवून ते लघु उद्योगाला देण्यात येणार असल्याचे समजते. सेनेच्या सत्ताधार्‍यांनी मिरकरवाड्यातील ती शाळा नव्याने विकसित केली जाणार आहे. ज्या ठिकाणी शाळेचे आरक्षण आहे, तेथे सर्व लघु उद्योग, रासायनिक उद्योग असल्याने तेथे शाळेला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. याचा सारासार विचार करून सत्ताधार्‍यांनी या भूखंडावरील आरक्षण बदलण्याचा घाट घातला आहे. याला एका राजकीय नेत्याता आशिर्वाद असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधक उद्याच्या सभेत काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.