सभापती पद न मिळाल्यास राष्ट्रवादी अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार 

सेनेसमोर नवा पेच; निर्णयाकडे नजरा 

रत्नागिरी:-राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये होऊ घातलेल्या सभापती निवडीत एक पद मिळावे अशी भुमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. सभापतीपद दिले नाही, तर अध्यक्षपदाची निवडणूक लढवू असा इशाराही राष्ट्रवादीने दिल्यामुळे शिवसेनेपुढे पदाधिकारी निवडीत पेच निर्माण होणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेची अध्यक्ष व सभापती निवड 22 मार्चला होणार आहे. येथे शिवसेनेचे वर्चस्व असल्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामधून उमेदवार निवडण्याचे आव्हानच आहे. शिवसेनेत अंतर्गत घडामोडी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भुमिका घेतली आहे. जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सहीचे पत्र पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांना दिले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर 15 सदस्य निवडून आले आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हापरिषदेत विरोधी पक्षात बसले आहे. पक्षाने गोपाळ पर्शुराम आडीवरेकर यांची गटनेता म्हणून नेमणूक केली आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. जिल्हा परिषदेतील सर्व समितीच्या सभापतींनी राजीनामा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामधील घटक पक्ष म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेत कोणतेही एक सभापती पद राष्ट्रवादीला मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. पक्षातर्फे आम्ही नाव पाठवू कृपया या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा असे त्या पत्रात नमुद केले आहे. तसेच सभापतीपद दिले नाही, तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार उभा करेल असेही त्यांनी बजावले आहे. मागील तिन टप्प्यात संधी न मिळालेल्या सदस्यांना सभापतीपदाची संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादीला संधी देताना शिवसेनेच्या एका सदस्यावर अन्याय होणार हे निश्‍चित आहे.