ग्रामीण भागातील शाळा भरणार सकाळच्या सत्रात

 वाढत्या उन्हामुळे निर्णय; शिक्षण विभागाचे आदेश 

रत्नागिरी:- वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी प्राथमिक शाळांमध्ये येणार्‍या ग्रामीण भागातील मुलांची गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळा सकाळच्या वेळी भरविण्याचे आदेश काढले आहे. ही बाब जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. शिक्षण विभागाकडून त्यांच्या सुचनेची गंभीर दखल घेतल्याबद्दल श्री. थेराडे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर काही काळ शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या; मात्र रुग्ण कमी होऊ लागल्यानंतर बंधने घालत शाळा सुरु करण्यास परवानगी दिली गेली; मात्र अजुनही पूर्ण वेळ शाळा सुरु केलेल्या नाहीत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार घड्याळी चार तास शाळा सुरु राहणे अपेक्षित आहे. त्यानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या पावणेतीन हजार शाळांपैकी सुमारे 70 टक्केहून अधिक शाळा सुरु आहेत. 1 ली ते 4 थीच्या शाळा मात्र बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. गेले आठवडाभर जिल्ह्यात कडाक्याचे उन पडत आहे. दुपारच्या सत्रात शाळा भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांना भर उन्हात चालत घरी परतावे लागते. उन्हाचा प्रचंड तडाखा बसत आहे. यामध्ये आरोग्याचा प्रश्‍नही उद्भवण्याची शक्यता आहे. अनेक गावांमध्ये एसटी बसेस सुरु नसल्यामुळे उन्हाचा मारा सहन करत चालत घरी परतावे लागते. ही बाबत सदस्य संतोष थेराडे यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच यावर तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली. या पत्राची दखल घेत शिक्षा विभागाकडून शाळांना पत्र काढण्यात आले आहे. भौगोलिक परिस्थिती पाहून तीव्र उन्हाळ्यामुळे तसेच प्राथमिक शाळांच्या वेळेत एक वाक्यता राहण्यासाठी वेळेत बदल करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत 5 वी ते 8 वी पर्यंतच्या शाळा सुरु आहेत. शासनाच्या घड्याळी तासाप्रमाणे सकाळी 7.30 ते सकाळी 11.30 वाजेपर्यंत शाळा भरण्यात येतील असे पत्र शिक्षण विभागाकडून 3 मार्चला काढण्यात आले आहेत.