रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर येथील एका मेडिकल मध्ये दोन दिवसांपूर्वी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणेने एक दिवस मेडिकल बंद ठेवण्याची सूचना करूनही याकडे केलेला दुर्लक्षपणा चांगलाच भोवला आहे.या मेडिकल मध्ये आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. मेडिकल मधील कर्मचाऱ्यांची अँटीजेन तपासणी हाती घेण्यात आली असून रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. शहरातील आरोग्य मंदिर येथील एका मेडिकल मध्ये 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. यानंतर खबरदारी म्हणून मेडिकल एक दिवस बंद ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या. मात्र, या सुचनेकडे दुर्लक्ष करत मालकाने मेडिकल सुरूच ठेवले. हा हलगर्जीपणा चांगलाच भोवला असून या मेडिकल मध्ये आणखी 2 कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून या मेडिकल मधील सर्व कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली असून मेडिकल एक दिवस बंद ठेवण्याची नोटीस ही देण्यात आली आहे.