कोकणातील पर्यटनाला मिळणार चालना; राष्ट्रीय महमार्गाचा दर्जा
रत्नागिरी:- रेवस-रेडी या 540 किलोमीटरच्या सागरी महामार्गासाठी 9 हजार कोटीची तरतुद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यास केंद्र शासनाने तत्वतः मान्यता दिली मात्र आर्थिक तरतूद नसल्याने त्याचे काम रखडले होते. आजच्या अर्थसंकल्पातील घोषणेमुळे या मार्गासह कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
कोकण पर्यटन विकासासाठी हा सागरी महामार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला हा समांतर मार्ग होणार आहे. अथांग पसरलेल्या समुद्र किनार्यावरून हा मार्ग होणार असल्याने पर्यटन वाढीला मोठा फायदा होणार आहे. किनारी भागामध्ये शासकीय जमीन कमी आहे. खासगी जमीनच जास्त प्रमाणात संपादित करावी लागणार आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून कमीत कमी 30 मीटर आणि जास्तीत जास्त 45 ते 60 मीटरचा दुपदरी किंवा चौपदरीचा पर्याय शासनाने ठेवला आहे. दुपदरीकरणाची अंदाजित रक्कम 1013.05 कोटी आहे. तर चौपदरीकरणाची किंमत 21239 कोटी एवढी आहे.
महामार्गाच्या कामासाठी 3 एजन्सी निश्चित केल्या आहेत. सर्व्हेक्षणाचे काम पुर्ण झाले आहे. अत्याधुनिक ड्रोन कॅमेर्याचा वापर करून प्रथमच सागरी महामार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या मार्गावर 44 खाडी पूल, अतिमहत्वाची 21 पूल आणि 22 मोठ्या मोर्या आहेत. रस्त्याची फेर आखणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये तीव्र वळण, उतर काढून जास्तीत जास्त तो सरळ करण्यात येणार आहे. हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला सुमारे 10 हजार कोटी खर्च झाल्यामुळे सागरी महामार्गाचे काम निधीअभावी मागे पडले होते. महाविकास आघाडीने सागरी महामार्गासाठी साडे नऊ हजार काटीची तरतूद केल्याची घोषणा केली. त्यामुळे या कामाला गती मिळणार असून कोकणात पर्यटनाला प्रचंड संधी उपलब्ध होणार आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या मार्गाला निधी उपलब्ध व्हावा, यासाठी यापूर्वी मागणी लवून धरली होती.