जे.एस.डब्ल्यु पोर्टच्या सिक्युरिटी सुपरवायजरला मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- जयगड येथील जे.एस.डब्ल्यु पोर्टच्या गेटवर मंगळवारी रात्री 10.30 वा.सुमारास सिक्युरिटी सुपरवायजरला शिवीगाळ करत मारहाण केली.यात त्याचा ड्युटीचा ड्रेस डाव्या बाजुला खांद्यावर फाटला असून याप्रकरणी 5 जणांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अथर्व मयेकर,ज्ञानेश्वर मयेकर,प्रार्थना मयेकर,दिव्या मयेकर (सर्व रा.सडेवाडी जयगड,रत्नागिरी) आणि अन्य एक अज्ञात मुलगी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात काडाप्पा मल्लाप्पा पुजारी (39,रा.खंडाळा,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,अथर्व मयेकर हा कंपनी ठेकेदारच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो. सोमवार 1 मार्च रोजी अथर्वने गेटवरील सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती.2 मार्च रोजी रात्री अथर्व पुन्हा कंपनीच्या गेटवर आला असता सुपरवायझर काडाप्पा पुजारी यांनी त्याला अडवून तु गार्डला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याने आतमध्ये सोडायचे नाही असा आदेश दिल्याचे सांगितले.

याचा राग आल्याने अथर्वने पुजारी यांनाही शिवीगाळ केली आणि तो निघून गेला.काही वेळाने अथर्व आपल्यासोबत अन्य संशयितांना घेउन कंपनीच्या गेटवर आला आणि संगनमताने पुजारी यांना शिवीगाळ व हातांच्या थापटांनी मारहाण केली.याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.