234 ग्रामपंचायतीमधील सदस्यांना पाणी योजना देखभाल-दुरुस्ती, पाणी गुणवत्तेवर मार्गदर्शन

रत्नागिरी:- जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 234 ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी, सदस्यांना
पाणी पुरवठा योजनेची देखभाल-दुरुस्ती, पाणी गुणवत्ता यासह विविध मुद्यांवर स्वच्छता विभागाच्या संचालकांसह अन्य अधिकार्‍यांनी दृकश्राव्य (ऑनलाईन) माध्यमातून मार्गदर्शन केले.

जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना 2024 पर्यंत ‘हर घर नल से जल’ प्रमाणे पाणी परवठा केला जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तीक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रतीदिन, गुणवत्ता पूर्ण पाणी पुरवठा करण्याचा प्रमुख उद्देश आहे. कोवीडच्या पार्श्वभूमिवर गावातील पाणी पुरवठा विषयक यंत्रणेची देखभाल दुरुस्ती तसेच पाणी गुणवत्ता विषयक कामाची खात्री करण्यासाठी कार्यक्रमाच्या विविध टप्पावर भागधारकांची क्षमता बांधणी होण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 100 टक्के वैयक्तीक नळ जोडण्या असलेल्या 234 ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती पदाधिकारी, महसुल गावनिहाय पाच महिला सदस्या यांचे ऑनलाईन पध्दतीने क्षमता बांधणी प्रशिक्षण सर्व शासकिय नियमांचे पालन करून घेण्यात आले. या प्रशिक्षणाला स्वच्छता विभागाचे संचालक राहुल साकोरे, अवर सचिव वसंत माने, उप व्यवस्थापक गणेश वाडेकर, डॉ. शैलेश कानडे हे दृकश्राव्याच्या (ऑनलाईन) माध्यमातून उपस्थित होते. यावेळी युनिसेफ मुबंईचे मंदार साठे यांनी जल जीवन मिशनची रुपरेषा व कार्यपध्दती या विषयक मार्गदर्शन केले. कोविडच्या पार्श्वभूमिवर सतर्कता यावर श्रीमती अपर्णा कुलकर्णी यांनी माहिती दिली. जिल्हास्तरावरून कार्यकारी अभिंयता व्हि. सी. उपाध्ये, गोविंद भारव्दाज, टि. बी. जाधव, संदीप माने व अजय सावंत व ए. बी. मरभळ उपस्थित होते.