2045 पर्यंत भारत महाशक्तीशाली देश बनेल: बाबा रामदेव 

रत्नागिरी:-भारत येत्या २०४५ पर्यंत सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने महाशक्तीशाली होईल. युक्रेनसारखे अन्य कोणताही देश भारताला नमवू किंवा दाबू शकत नाही. त्याचा पाया भक्कम करण्याचे काम आम्ही ३० वर्षांपासून सुरू केले आहे. आता जगातील २०० करोड जनता योगाला मानू लागली आहे, असा दावा योगऋषि पूज्य स्वामी रामदेव जी महाराज यांनी केला.आकाशातुन किंवा जमिनीवरून पाहिले तरी रत्नागिरी हे पृथ्वीवरील स्वर्ग आहे. येथील निसर्ग एवढा सुंदर आहे की, माणस आजारी पडू शकत नाहीत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ उद्योजक आण्णा सामंत व अन्य पतंजलिचे साधक उपस्थित होते. रामदेव महाराज म्हणाले, अकरा वर्षानंतर रत्नागिरीमध्ये आलो. तेजस्वी पुरूष वीर सावरकर, स्वतंत्र हा माझा जन्मशिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळक यांना नतमस्तक झालो. कोरोना काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षानंतर योगाचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम महिला दिनाचे औचित्य साधुन रत्नागिरीत होत आहे. पतंजलिचे साडे दहा लाख कार्यकर्ते आणि ५० लाख साधक आहेत. महिला ही अबला नाही.महिला मातृशक्ती आहे. आईचा गौरव करा, तिचा आशीर्वादच सर्वांत मोठा आहे. त्यामुळे महिलेला कधी कमी लेखू नका.

कोरोना काळामध्ये काही ड्रग आणि मेडिकल माफियांनी अक्षरशः धिंगाणा घातला. जे हॉस्पिटलला गेले ते मृत होऊन परत आले. तेवढेच नाही, तर लाखोंचे बिल घेऊन आले. मात्र योगावर ज्यांनी भरोसा केला त्यातील ९० टक्के लोकांनी या काळात कोरोनावर मात केली. आध्यात्मिक भारत निर्माण करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. योगा करणे हा राष्ट्रधर्म अन ती एक सेवा आहे ,असे रामदेव महाराज म्हणाले.

सावरकरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी देशाच्या एकात्मिकता आणि स्वतंत्र्यासाठी मोठा त्याग केला आहे. या राष्ट्रीय पुरूषांच्या पराकोटीच्या त्यागामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, नव्हे तर ते त्या पुरस्काराचे दावेदार आहेत, असे स्पष्टमत रामदेव महाराज यांनी व्यक्त केले.