वांद्रीजवळ मतदारांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला अपघात

देवरुख:- मुंबईहून राजापुरात मतदानासाठी जाणाऱ्या खासगी बस आणि व्हॅगनार गाड्यांचा अपघात झाला. हा अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री येथे व्हॅगनार कारने लक्झरीला धडक दिल्याने झाला. या अपघातात व्हॅगनार कारमधील महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली आहे.

व्हॅगनार वेंगुर्लेहून डोंबिवलीच्या दिशेने वाहन चालक शेखर गणपत दाभोळकर (५४) हे घेऊन जात होते. त्याच वेळी समोरून लक्झरी मुंबईतून राजापूरला जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर वांद्री भंडारवाडी येथे हा अपघात सकाळी ८.३० वाजता झाला. बस मुंबईतून राजापूरला मतदानासाठी मतदारांना घेऊन जात होती. याचवेळी रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने कार चालली होती. वांद्री येथे कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तिने लक्झरीला समोरून धडक दिली. यामध्ये लक्झरीचे दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर येथील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.