सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ टाकल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

रत्नागिरी:- निवडणूक काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ, ऑडियो टाकल्याप्रकरणी रत्नागिरीत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूरेश पाटील, मिरजोळे रत्नागिरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार माजी नगरसेवक निमेश नायर यांनी पोलीस स्थानकात दिली आहे.

निवडणूक प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर पोलिसांनी एक पत्रक जाहीर केले होते. यामध्ये त्यांनी सोशल मीडियावर कुणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नयेत असे आवाहन केले होते. निवडणूक काळात पोलीस यंत्रणा सोशल मोदींवर लक्ष ठेवून आहे हे माहीत असतानाही या तरुणाने आक्षेपार्ह व्हिडीओ आणि ऑडियो व्हायरल केले. त्याने मीडियावर बदनामीकारक व्हिडीओ पोस्ट केल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाची अवमान केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात बीएनएस कलम २२३, १७५, ३५६(२), लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूरेश पाटील याने तीन ऑडिओ व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित केल्या आहेत. या क्लिप अजून कुणी प्रसारित केल्या आहेत याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात असून अजून काहींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.