चिपळूण:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गणेशखिंड येथे मंगळवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास तपासणी सुरू असताना ९५ हजारांची रक्कम सापडल्याची खळबळजनक घटना घडली. या रकमेची कागदपत्र नसल्याने ही रक्कम जप्त करत चिपळूण ट्रेझरीकडे जमा करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच त्यानुसार कार्यरत असलेल्या तपासणी पथकाद्वारे शहरास जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरच्या वाहनाची तपासणी केली जात आहे. मंगळवारी रात्री १२.३० वाजेदरम्यान तालुक्यातील गणेशखिंड येथे तपासणी पथकप्रमुख रोहित गवस यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनाची तपासणी सुरू होती. यावेळी गणेशखिंड येथे आलेल्या वाहनाच्या तपासणीदरम्यान त्यामध्ये ९५ हजारांची रक्कम सापडली. या रक्कमेची कागदपत्रे नसल्याने ती रक्कम चिपळूण ट्रेझरी येथे जमा करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी परशुराम घाटाच्या पायथ्याशी फरशीतिठा येथील तपासणी पथकाने नियमित वाहनांची तपासणी करताना सुमारे अडीच लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. विविध ठिकाणी वाहनांची तपासणी होत असल्याने गैरकारभाराला काहीसा आळा बसला आहे.