गैरसमज पसरवणाऱ्यांना मैदानात पराभूत करणार: दिनेश सावंत

रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उबाठाचे उमेदवार बाळ माने हे मागील १० वर्षापासून मे. मिऱ्या पोर्ट प्रा.लि.च्या माध्यमातून पोर्ट उभारणीसाठी प्रयत्नशील होते. मिऱ्या येथे इंटरनॅशनल पोर्ट, लॉजिस्टीक पार्क झाल्यास त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार होते. त्यामुळेच ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवल्याचा आरोप मिऱ्या येथील ग्रामस्थ दिनेश सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.

आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करु शकलो असतो, परंतु मिऱ्या ग्रामस्थांमध्ये चुकीची माहिती व गैरसमज पसरवणाऱ्यांना मैदानात घेऊन पराभूत करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

रत्नागिरीत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सडामिऱ्या सरपंच अर्पिता सावंत, ग्रा.पं.सदस्य शिल्पा पवार, जाकिमिऱ्या सरपंच कीर, निशांत सावंत, भैय्या भाटकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी खंडाळा येथील नंदकुमार बेंद्रे, जयगड येथील शराफत गडबडे, जयगड मच्छीमार सोसायटीचे व्हाईस चेअरमन सलीम मिरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मिऱ्या येथे एमआयडीसीच्या माध्यमातून लॉजिस्टीक पार्क आणि इंटरनॅशनल पोर्ट उभारणार होते. परंतु ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात जागा जाणार, देवस्थानच्या जागा जाणार, अशा सांगून ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवल्याचा आरोप माजी सरपंच दिनेश सावंत यांनी केला. माजी आमदार बाळ माने यांच्या जाकीमिऱ्या येथील निवासस्थान असलेल्या कमलाश्रमच्या नावाने मिऱ्या पोर्ट प्रा. लि. नावाने कंपनी रजिस्टर्ड करण्यात आली आहे. यासाठी काही एकर जागा मेरीटाईम बोर्डकडून लीजवर घेण्यात आली होती. त्याचे पैसेही भरण्यात येत होते. २०१७ मधील लीजचे पैसे भरले गेले नव्हते. ते. २९ ऑक्टोबरला जमा करण्यात आले. आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करु शकलो असतो, परंतु मिऱ्या ग्रामस्थांमध्ये चुकीची माहिती व गैरसमज पसरवणाऱ्यांना मैदानात घेऊन पराभूत करणार असल्याचे दिनेश सावंत यांनी सांगितले. सावंत यांच्याप्रमाणेच वाटद जि.प. गटातील काही ट्रक मालकही उपस्थित होते.