जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा उपक्रम
गणपतीपुळे:- देवरूख येथे संगमेश्वर तालुक्यात नव्याने जिल्हा परिषद शाळेत नियुक्त झालेल्या सुमारे २०० प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण झाले. हे प्रशिक्षणानंतर दोन मित्र गणपतीपुळे येथे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर मतदान करा, असे वाळूशिल्प काढून जागृती केली.
देवरूख येथील प्रशिक्षणामधून बाहेर पडलेल्या शिक्षकामध्ये राहुल इंगळे व देवीदास जंगमे हे दोघे मित्र रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेले. दर्शनानंतर ते गणपतीपुळे किनाऱ्यावर फिरत होते. हे दोघेही बुलढाणा व नांदेड येथील आहेत. त्यावेळी त्यांनी किनाऱ्यावर लहान मुले आणि अनेकजण वाळूत काही चित्रे काढत होते. त्यावरूच त्यांनीही काहीतरी काढूया असे ठरवले.
20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाबाबत जागरुकता आणणारा संदेश देण्यासाठी त्याचे शिल्प काढण्याचे ठरवले. चला मतदान करूया असे शिल्प त्यांनी वाळूत रेखाटले. निवडणूक आयोगाचे बोट, हाताचे शिल्प, त्याखाली चला मतदान करूया असे काढण्याचे ठरवून त्यांनी दुपारी एक वाजता शिल्प काढण्यास सुरुवात करून सुमारे तीन तासांनी हे शिल्प तयार झाले. इथे समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनीही याचे कौतुक केले.