रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाच्या नाकाबंदीने सर्वांची झोप उडाली आहे. स्थिर व फिरत्या तपासणी पथकाच्या डोळ्यांखालून कुणी सुटू शकणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मागील काही दिवसांत लाखो रुपयांची रोख व किमती ऐवज जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी पथकाने एका सोन्याची पेढीचे सोने व चांदी असा सुमारे 35 लाखांचा ऐवज ताब्यात घेतल्यामुळे सुवर्णकारांमध्ये खळबळ उडाली आहे.
निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून रत्नागिरी विधानसभेत येणार्या वाहनांची स्थिर व फिरत्या पथकांद्वारे तपासणी करण्यात येत आहे. तालुक्याच्या बाहेर जाणार्या मार्गांवर तपासणी पथके तैनात असून हजारो गाड्या आतापर्यंत तपासण्यात आल्या आहेत. अगदी दुचाकी वाहनेही तपासण्यात येत आहेत.
सोमवारीही बँका तसेच एटीएमना रोकड पोहचवणार्या गाड्या तपासण्यात आल्या. त्यांच्याजवळ असणार्या कागदपत्रांप्रमाणेच कॅश आहे का, याची मोजणी करण्यात आली. जवळपास सव्वा कोटीच्या आसपास या गाड्यांमध्ये कॅश होती; मात्र कागदपत्रांनुसार कॅश बरोबर मोजली गेल्यावर ती सोडण्यात आली.
मंगळवारीही एका सुवर्णपेढीचे सोने व चांदी रत्नागिरीत आणण्यात येत होते. यात 439 ग्रॅम सोने, तर 2 हजार 503 ग्रॅम चांदी म्हणजे अडीच किलो चांदी गाडीमध्ये होती. गाडीतील व्यक्तींकडे असणार्या कागदपत्रावर स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे ही गाडी ताब्यात घेण्यात आली. संबंधित व्यक्तींना पूर्ण कागदपत्रे आणण्याच्या सूचना अधिकार्यांनी केल्या, तोपर्यंत किंमती ऐवज ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे सुवर्णकारांमध्येही खळबळ उडाली आहे. अशा पध्दतीने प्रथमच कारवाई झाल्याचे मत सुवर्णकारांकडून व्यक्त करण्यात आले.
जीवन देसाई, निवडणूक निर्णय अधिकारी, रत्नागिरी मतदारसंघयापूर्वी बँका व एटीएमना कॅश पोहोचवणार्या गाड्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. सर्वच व्यावसायिकांना समान न्याय आहे. कॅश किंवा किमती ऐवज सोबत ठेवताना त्याची कागदपत्रेही जवळ बाळगावीत. सुवर्णपेढी व्यावसायिकांनी सोने किंवा चांदीची खरेदी-विक्री कागदपत्रे वाहतुकीच्यावेळी सोबत ठेवावीत.