वनक्षेत्रातील झाडांचे नुकसान; जेसीबी, जमीनमालकांवर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील ताडील येथे जमीन उत्खननावेळी राखीव वनक्षेत्राततील झाडांचे नुकसान करणाऱ्या जेसीबीचालकासह जमीन मालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच जेसीबीसह सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे. याबाबत वन विभागाकडून दिलेल्या पत्रकानुसार, दापोली तालुक्यातील ताडील येथे जे.सी. बी.च्या साहाय्याने जमिनीत उत्खनन सुरू होते.

यावेळी राखीव वनक्षेत्रातील ऐन, पांगारा ही झाडे धक्का पोहचला. त्यामुळे यातील पाच झाडांचे नुकसान झाले. हा जेसीबी जप्त करण्यात आला आहे. तसेच जेसीबी चालक हिरालाल रामेश्वर मेहता, (रा. स.रा. नवानगर ता. दापोली) तसेच जमिनमालक अन्वर महम्मद सुर्वे (स.रा. मुंबई ) यांच्यावर भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६ कलमानुसार वनपाल आर. डी. खोत यांनी गुन्हा दाखल केला आहे. जेसीबीसह सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. ही कारवाई परिक्षेत्र वन अधिकारी, पी. जी. पाटील, वनपाल आर. डी. खोत, वनरक्षक शुभांगी भिलारे, ताडील, सुरज जगताप, शुभांगी गुरव यांच्या पथकाने केली. सरकारी वनातील माती, मुरूम, औषधी वनस्पती, झाडांची चोरी, अतिक्रमण, प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत वनविभागास कळवावे आणि राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करावे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांनी केले आहे.