काँग्रेसकडून रमेश कीर, सहदेव बेटकरांसह हुस्नबानु खलिफे यांची समन्वयकपदी नियुक्ती

रत्नागिरी:-  जिल्ह्यात विधानसभा निवडणूकी दरम्यान सर्वच मतदारसंघात समन्वय राहण्यासाठी काँग्रेसतर्फे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी रमेश कीर, हुस्नबानु खलिफे आणि सहदेव बेटकर यांची जिल्हा काँग्रेस कमिटीचे समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

राज्यात काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट यांनी महाविकास आघाडीची मोट बांधली आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे  उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अविनाश लाड यांच्या बंडानंतर पाचही मतदारसंघात मविआच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मान्यतेवरुन प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणूकीसाठी रमेश कीर, हुस्नबानु खलिफे आणि सहदेव बेटकर यांची जिल्हा काँग्रेस कमिटीचे समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यावर केलेल्या ६ वर्षांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने तातडीने समन्वयक नियुक्तीचा आदेश दिला आहे.