चिपळूण:- मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूणच्या परशुराम घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आज रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की एसटीचा दर्शनी बाजूचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे दुचाकी आणि एसटी बसमधील प्रवाशी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत.
अपघातातील जखमींना आता उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर महामार्गावर एकेरी वाहतूक सूरू आहे. कोकणात सध्या थंडी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहाटे धुक्याचे साम्राज्य असते. या धुक्यामुळे अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशात आज मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूणला जोडणाऱ्या परशुराम घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे पहाटे 6 वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे.
एसटी बस, कंटेनर, कार आणि दुचाकी या अशा चार वाहनांनी एकमेकांना भीषण धडक दिली. या धडकेत एसटीचा अक्षरश चक्काचूर झाला आहे. तसेच एसटी आणि दुचाकीवर असलेले चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना आता उपचाराकरता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे सध्या या प्रवाशांवर उपचार सूरू आहेत. या अपघातानंतर महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सूरू केला आहे. या अपघातानंतर सध्या मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सूरू ठेवण्यात आली आहे. तसेच दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.