काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड पक्षातून निलंबित

राज्यभरात १६ नेत्यांवर निलंबनाची कारवाई

रत्नागिरी:- प्रदेश काँग्रेसकडून बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यांचे आदेशानुसार व प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी १६ नेत्यांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. यात रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, राजापूर मतदारसंघातील बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांचा समावेश आहे.

लांजा- राजापूर- साखरपा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजन साळवी हे अधिकृत उमेदवार असतानाही रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी पक्षादेश झुगारून बंडखोरी केली होती. यामुळे अविनाश लाड यांच्यावर ६ वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे.

काँग्रेसने महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघातील तिकीट वाटप केले आहे. तथापि, काही पदाधिकाऱ्यांनी घटक पक्षांच्या उमेदवारांविरोधात नामांकन भरत पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला व प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार या बंडखोर पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशा माहिती नाना पटोले यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे परिपत्रक जारी करत देण्यात आली आहे.

काँग्रेसचे अविनाश लाड, आनंदराव गेडाम, शिलु चिमूरकर, सोनल कोवे, भरत येरमे, अभिलाषा गावतूरे, राजु झोडे, प्रेमसागर गणवीर, जय लांजेवार, विलास रघुनाथ पाटील, आसमा जव्वाद चिखलेकर, हंसकुमार पांडे, कमल व्यवहारे, मोहनराव दांडेकर, मंगल विलास भूजबळ, मनोज शिंदे, सुरेश पाटील खेडे, विजय खडसे, शबीर खान, याज्ञवल्क्य जिचकार, राजेंद्र मुळक यांना प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी निलंबित केले आहे.