जिल्ह्यात श्रमदानातून बांधणार साडेआठ हजार बंधारे

रत्नागिरी:- नोव्हेंबर महिन्याची सुरवात झाली तरी पावसाने आपला मुक्काम कायम ठेवला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सुरू होणारे बंधारे बांधण्याचे काम यंदा लांबणीवर पडले आहे. अर्थात, उशिरापर्यंतचा पाऊस आणि लांबलेले बंधारे यामुळे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे संकटही लांबणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे ८ हजार ५०० बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येते.

प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते. येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीत न मुरता नदीनाले, समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात सन २०२३ मध्ये ३११८ मि. मी. म्हणजेच ९२ टक्के पाऊस पडला; मात्र, यंदा २०२४ या वर्षात पावसाचे प्रमाण जास्त असून ३ हजार ७०५ मि. मी. म्हणजेच ११० टक्के पाऊस आतापर्यंत पडला आहे. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच प्रशासन तयारीला लागले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी ‘मिशन बंधारे’ ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये वनराई, कच्चे आणि विजय बंधारे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला १० बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन श्रमदानातून हे बंधारे उभारण्यात येणार आहेत.

यंदा जिल्ह्यात नाव्हेंबर महिन्याची सुरवात झाली तरी पाऊस सुरू होता. दरवर्षी बंधारे उभारण्याचे काम गांधी जयंतीला २ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येते; मात्र, पाऊस लांबणीवर पडल्याने अद्याप बंधारे उभारण्याचे काम सुरू झालेले नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून किती बंधारे उभारणार याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाने मागवली आहे. त्यामध्ये ९ तालुक्यांपैकी रत्नागिरी आणि गुहागर या दोनच तालुक्यांतून आकडेवारी आली आहे. इतर ७ तालुक्यांनी अद्याप बंधारे उभारण्याची आकडेवारी दिलेली नाही.

टंचाईच्या तीव्रतेवर उपाय

जिल्ह्यात पाण्याची बचत आणि साठवण केलेल्यास त्याचे उन्हाळ्यात मिळणारे फायदे लक्षात घेऊन पाणी अडवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून कच्चे बंधारे उभारण्याची मोहीम प्रत्येक गाव, वाडीमध्ये राबवण्यात येते. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत होऊन उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी होते.