संगमेश्वर:- संगमेश्वर नजीकच्या धामणी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह बडदवाडी येथे नदीपात्राजवळ एका झुडपात बुधवारी सायंकाळी सापडला.
धामणी येथील प्रशांत बुद्धम पवार (वय ३४) हे २९ ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता घरातून निघून गेले होते. त्यांनी आपण अहमदाबाद येथे जातो म्हणून सांगितले होते. बरेच दिवस झाले, ते घरी न आल्याने व कोणताही संपर्क त्या काळात न झाल्याने संगमेश्वर पोलिस ठाणे येथे ते बेपत्ता असल्याची नोंद दाखल करण्यात आली होती. बेपत्ता झालेल्या तरुणाचा बुधवारी धामणी-बडदवाडी नदीपात्राजवळ झुडपात कुजलेल्या स्थितीत मृतदेह मिळून आला. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस दाखल झाले आणि पुढील कार्यवाही करून मृतदेह विच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठण्यात आला.