रत्नागिरी:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मंगळवारी साळवीस्टॉप येथे झालेली सभा कॉर्नरसभा होती. मुख्यमंत्री असताना रिफायनरी बारसुमध्ये व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र दिलं, आता तेच उद्धव ठाकरे मी बारसू रिफायनरी रद्द करणार अशी भूमिका घेत आहेत. विद्यमान उमेदवार रिफायनरीचं समर्थन करतात, तर माजी खासदार हे विरोध करतात अशा यांच्या भुमिका असल्याची टिका राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी केली.
कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर येऊन घाणेरड्या भाषेत बदनामीकारक बोलणं, तेही एका पक्षाच्या प्रमुखाने बोलणं हे मी माझ्या राजकिय कारकिर्दीत पहिल्यांदाच बघतोय. ज्यावेळी मी राष्ट्रवादीतून त्यांच्याकडे गेलो तेव्हा माझी स्तुती केली, नंतर मी मंत्री झालो तेव्हा मी चांगला होतो, पण शिंदे साहेबांसोबत गेल्यावर मी वाईट झालो असेही ना.सामंत यांनी सांगितले.
आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना, स्वत: मुख्यमंत्री असताना तुमचे चिरंजीव पर्यावरण मंत्री होते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही दोन भाऊ आमदार होतोय, हे त्यांना दु:ख होतंय. जो नेता, जी व्यक्ती माझ्यावर टोकाची टीका करतो, त्याच दिवशी माझी १० ते १५ मतं वाढलेली असतात. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवाराच्या प्रचाराला आलेल्या उद्धव ठाकरेंना मनापासून धन्यवाद. भावी पिढीला महाराष्ट्राच्या विकासात्मक गोष्टी सांगितल्या असत्यात तर चारपाच हजार मतं वाढायला मदत झाली असती, पण शेवटी ही दुर्बुद्धी असते आम्ही सर्वसामान्यातून मोठं झाल्याने काही लोकांना पोटशूळ असल्याचे ना.उदय सामंत यांनी सांगितले.