रत्नागिरी:- महाराष्ट्रचा स्वाभिमान, लढावूबाणा कोणीही विकत घेवू शकत नाही. गद्दारी करुन सत्तेत गेलेल्यांना पैशाची मस्ती आली आहे. ते प्रत्येकाला विकत घेवू पहात आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्राला दिशा देण्याची वेळ आली असून तो अधिकार लोकशाहीने तुम्हाला दिला आहे. तुमच्याकडे आता न्याय मागत असून ही अस्तित्वाची लढाई आहे. ती आपल्याला जिंकायची आहे. कोकणी बांधव शांत बसतो आणि काय करायचे ते करुन दाखवतोच हे मी पाहिले आहे. आता मला मशाल धगधगती पाहिजे आहे. धगधगत्या मशालीने खोक्यांचे राजकारण जाळून टाका असे सांगत महाविकास आघाडीची सत्ता येणारच आहे. सत्ता आल्यानंतर प्रथम जिवनावश्यक वस्तूचे दर स्थिर करत मोफत शिक्षण देण्यासोबतच बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द केला जाईल अशी घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
रत्नागिरी आणि राजापूर विधानसभेसाठी शिवसेना उबाठाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जलतरण तलावाशेजारील मैदानात जाहीर सभा घेतली. यावेळी माजी खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत, आमदार भास्करशेठ जाधव, आमदार राजन साळवी, चिपळूणचे उमेदवार राष्ट्रवादीचे प्रशांत यादव, रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने, माजी पालकमंत्री रविंद्र माने, माजी आम. सुभाष बने, शिवसेना नेते अजित यशवंतराव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आम. रमेश कदम, माजी विधान परिषद सदस्या ॲड. हुस्नबानू खलिफे, नेहा माने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, काँग्रेसचे खेत्री, सौ.माधवी माने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सौ.उल्का विश्वासराव, सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, राजन सुर्वे आदी नेते, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत.
यावेळी उध्दव ठाकरे बोलताना म्हणाले की, कोणी किती पैसेवाला असू दे पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो स्वाभिमान आणि जिद्द आहे तो कोणी विकत घेऊ शकत नाही. लोकसभेच्या वेळेला मी याच मैदानात आलो होतो, आपल्याला भेटायला, एका गोष्टीच मला अर्धे समाधान आहे आणि अर्धे थोडंसं वाईट पण या भागाने आपल्याला चांगलं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी चांगले आशीर्वाद दिले. तसेच आशिर्वाद आताही तुम्ही या सर्वांच्या मागे द्यावेत. माझ्यावरती घराणेशाहीचे आरोप करतात, ते आरोप मला मान्य आहेत. माझ्या वडीलांनी शिवसेना निर्माण केली आहे. कोणी किती बाजूला गेले तरी माझी हक्काची माणसं सोबत आहेत. सर्वत्र आता मशाल धगधगायला लागली आहे. मुंबईपासून कोकणच्या टोकापर्यंत खोकेबाजीचे राजकारण आता भस्म करायचे आहे.
कोकणचा व महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. कोकण कुणाचे हा प्रश्न आहे, तुमचे की गुंडांचे, येथील जनतेने ते गुंडांच्या हातात द्यायचे की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या ही ठरवण्याची वेळ आली आहे. कोकणात कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या आणि विरोधकांच्या मध्ये मी उभा असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.घरात बसून राज्य चालवल्याचा आरोप माPयावर केला जातो. परंतु घरात बसून आपण महाराष्ट्रातील घरे वाचवली. याच काळात उत्तर भारतात मृत्यूचे तांडव होते, गंगेत मृतदेह वाहत होते. मात्र महाराष्ट्र सुरक्षित राहिल्याचे त्यांनी सांगितले.
ना.उदय सामंत यांच्यावर टिका
२०१४ आपल्याला बाळ मानें विरोधात लढावं लागलं होतं. केवळ तुम्ही माझ्यावरती भरोसा ठेवून त्यांना निवडून दिल होतं. २०१९ तुम्ही खळखळ नाही केली. बंडखोरी वगैरे केली नाही. अगदी माने म्हटल्यानंतर मानेवरती घेतलेलं हे भूत आता मानेवरनं उतरायला पाहिजे. या उद्योग मंत्र्यांनी रत्नागिरीतच काय महाराष्ट्रात एक उद्योग आणला नाही. असा निरुपयोगी मंत्री परत मत मागायला येतात आणि आपण मत देणार आहात काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
जाहिरनाम्याची केली घोषणा
यापुढे महाराष्ट्रात मुलींबरोबरच मुलांनाही मोफत शिक्षण देणार असून जीवनावश्यक वस्तुंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवणार आहोत. सध्या पंधराशे रुपये देऊन मायमाऊलींकडून सात ते आठ हजार रुपये काढून घेतले जात असल्याची टिकाही त्यांनी केली. महिलांवरील अत्याचाराविरोधात तात्काळ कारवाईसाठी महिला पोलीस स्थानके उभारणार असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवले.दोन्ही विधानसभा मतदार संघाच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे यांचा हार घालून सत्कार केला.