आंबा घाटात ट्रक पलटी; वाहतूक ठप्प

साखरपा: कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा (ता. शाहूवाडी) घाट उतरताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. रविवारी (दि.३) सकाळी आठ वाजताच्या सुमारास आंबा खिंडीजवळ अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे व ट्रक मधील मालाचे आर्थिक नुकसान झाले. या अपघातामुळे तीन तास वाहतूक ठप्प होती. साखर व इतर माल घेऊन रत्नागिरीकडे जाताना घाटात ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, देवाळे (ता.पन्हाळा) येथील सुतार यांचा ट्रक रत्नागिरी येथील डी.मार्टचा माल घेऊन आंबा घाटातून निघाला होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. ट्रक पलटी होताच चालक तेथून पसार झाला. घाटात कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्यावर खडी विखुरल्याने वाहन चालकास मोठी कसरत करावी लागते. ट्रक मध्येच‌ पलटी झाल्याने तीन तास वाहतूक खंडीत झाली.

घाट परीसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साखरपा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार नितीन जाधव आणि प्रदीप कामटे यांनी वाहतूकीचे नियंत्रण केले. साडे दहा वाजता क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून एकेरी वाहतूक चालू करण्यात आली.