ओळखीचा गैरफायदा घेत महिलेवर अत्याचार

चिपळूण:- शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेच्या ओळखीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यावर येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने तिच्याकडून १ लाख २० हजार रूपये, ८ तोळ्याचे दागिने व आयफोनही लाटला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेने येथे खळबळ उडाली आहे. एजाज मुशताक माखजनकर (उक्ताड-बायपास) असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे.

या बाबत ३६ वर्षाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नोव्हेंबर २०१९ कोविड काळात एजाज हा एका ओळखीच्या माध्यमातून फोनद्वारे आपल्या संपर्कात आला. त्यानंतर तो व्हिडीओ कॉल करू लागल्याने आपले मैत्रीचे संबंध झाले. यातून त्याने आपले व्हिडिओ केले. तसेच फोटोही काढले. हे आपल्या लक्षात आल्यावर आपण त्याच्यापासून लांब होण्याचा प्रयत्न केला असता त्याने ते व्हायरल करीन, तुझ्या मुलीला गायब करीन, अशा धमक्या दिल्या. वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तसेच आपल्या घरी येऊन पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

तसेच नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्याने १ लाख २० हजार रुपये रोख व गुगल पेद्वारे घेतले. आपले – ७ ते ८ तोळ्याचे दागिने त्याने घेतले असून ते अद्याप परत दिले नाहीत. २०२३ मध्ये एका बँकेतून कर्ज काढून माझ्या नावे आयफोन खरेदी केला. फेब्रुवारी २०२४ मध्ये आपण फोनचा हप्ता थकल्याने तो परत मागितला असता मी तुझी वाट लावेन, अशी धमकी दिल्याचे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे एजाज याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या बाबतचा तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.