भोस्ते घाटातील मृतदेह प्रकरणी पोलीस तामिळनाडू, कोल्हापूरला रवाना

खेड:- खेड भोस्ते घाटातील मृतदेहाबाबतचा गुंता अद्याप सुटलेला नाही. या मृतदेहाची माहिती देणारा एकमेव साक्षीदार परागंदा झाला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठया अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेली दीड महिने पोलीस या प्रकरणाचा छडा लावत आहेत. मात्र कोणताच धागादोरा पोलिसांना हाती लागलेला नाही.

सावंतवाडीतील तरुणाला पडलेल्या स्वप्नामुळे खेड भोस्ते घाटातील मृतदेहाची माहिती पुढे आली; परंतु तो मृतदेह कोणाचा, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्या मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या टायगर माचिसवरून पोलिस थेट तामिळनाडूत पोहेचले व तेथून त्याची लिंक कोल्हापूर येथील माचिस वितरकापर्यंत आली आहे.

या प्रकरणात कोल्हापुरातील बेपत्ता लोकांचीही पोलिस माहिती घेत आहेत. यातून या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिस कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत.

सिंधुदुर्गमधील सावंतवाडी आजगाव येथील योगेश पिंपळ आर्या याला खेड भोस्ते घाटातील डोंगरात जंगलात पुरुषाचे प्रेत असून, तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा, असे सांगत असल्याचे त्याने खेड पोलिसांना सांगितले. 17 सप्टेंबरला याबाबत आर्याने खेड पोलिस ठाण्यात तशी खबर दिली. त्यानंतर तपासात भोस्ते घाटात मृतदेह मिळून आला होता. हा प्रकार सर्वांनाच अचिंबीत करणारा होता. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये तरूणाने सांगितलेला घटनाक्रम आणि वस्तुस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले. परंतु सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.

याच दरम्यान तपासात पोलिसांना मृतदेहाच्या अंगावर असलेल्या कपड्यामध्ये माचिस सापडली. टायगर ब्रॅण्डची ही माचिस असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. माचिसवरुन पोलीस पथक थेट तामिळनाडूत चौकशीला गेले. त्याठिकाणी ती कोल्हापुरातील वितरकाकडून वितरित झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कोल्हापूर येथे या प्रकरणाची लिंक लागते का, याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे, त्यासाठी कोल्हापूरमधून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.

स्वप्नाबाबत माहिती सांगणारा योगेश बेपत्ताच

पडलेल्या स्वप्नाबाबत माहिती सांगणारा योगेश आर्या या प्रकरणानंतर गायब झाला आहे. त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही. त्याला पडणार्‍या स्वप्नांविषयी मानसोपचारतज्ज्ञांकडून अहवाल मागवण्यात आला होता. त्यात त्याला स्वप्न रंगवण्याचा आजार असल्याचेही पुढे आले आहे.