रत्नागिरी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी बंडाळी उफाळून आली आहे. माजी जि.प. अध्यक्ष उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी उदय बने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उदय बने हे इच्छूक होते. त्यांनी या मतदारसंघात उमेदवारीसाठी दावा केला होता. काही विभागप्रमुखांच्या सह्यांचे पत्रदेखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते. पण मातोश्रीवर काही पदाधिकार्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत असताना अनेकांनी पक्षप्रमुख निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असे सांगितल्याने बने यांच्या उमेदवारीत अडसर निर्माण झाला होता. त्याचवेळी भाजपमधून आलेले माजी आ. बाळ माने यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला आणि शिवसेनेतील बंडाळी अधिकच उफाळून आली.
बाळ माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याने उबाठामध्ये नाराजीसत्र सुरूच होते. उबाठामधील काही शिवसैनिक या निर्णयामुळे नाराज झाले होते. बने यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी लावून धरली होती. त्यामुळे उदय बने अपक्ष उमेदवारी दाखल करणार का? याबाबत चर्चांना पेव फुटले होते. अखेर मंगळवारी शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
नाराज असलेले उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीसह महायुतीमध्येदेखील खळबळ उडाली आहे. एक सच्चा शिवसैनिक म्हणून बने यांची ओळख आहे. चार नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे उदय बने यांची मनधरणी करण्यासाठी आता थेट मातोश्रीवर प्रयत्न होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.