शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी पुन्हा ऑफलाईन

रत्नागिरी:- राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी चालू शैक्षणिक वर्षापासून मोबाईल अ‍ॅपवर घेण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार अनेक शाळांमध्ये काही दिवस शिक्षकांनी मोबाईल अ‍ॅपवर विद्यार्थ्यांची हजेरी घेतली; मात्र या मोबाईल अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने शाळांमध्ये पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांची हजेरी रजिस्टरवरच घेतली जात आहे. त्यामुळे स्विफ्ट चॅट अ‍ॅपच्या तांत्रिक अडचणीचा घोळ यावर्षात तरी दूर होणार का? असा प्रश्न शिक्षकांना भेडसावू लागला आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या समग्र शिक्षा अंतर्गत विद्या समीक्षा केंद्राद्वारे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी नोंदवण्याच्या उपक्रमाला एक वर्षापूर्वी सुरुवात झाली. या उपक्रमात जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच अनुदानित शाळांना आनॅलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवण्याबाबत आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार शाळांमधील शिक्षकांनी विद्या समीक्षा केंद्राच्या स्विफ्ट चॅट या अ‍ॅप्लिकेशनमधील बॉटद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यास सुरूवात केली.

या उपक्रमामुळे वर्गात प्रत्यक्षात किती विद्यार्थी उपस्थित असतात, याची माहिती उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश शाळा दुर्गम भागात आहेत. या ठिकाणी मोबाईलला रेंजही नसते. त्यामुळे शाळेतील शिक्षकांकडून एखाद्या अधिकार्‍याला कार्यालयीन माहिती घेणे अवघड होत आहे.

सध्या नेटवर्क प्रॉब्लेम,अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी व डाटा ओपण होण्यास लागत असलेला जास्तीचा वेळ वामुळे शिक्षकांनी अ‍ॅपवर हजेरी घेणे बंद केले असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. पूर्वीप्रमाणेच म्हणजेच रजिस्टरवरच विद्यार्थ्यांची हजेरी घेणे सुरू केले आहे. त्यामुळे एकाही शाळेत स्विफ्ट चॅट अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. वेळोवेळी या अ‍ॅपला तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने या अ‍ॅपमधील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

अ‍ॅपवर माहिती भरण्यातच वेळ

शिक्षण विभाग दररोज नवनवीन फतवा काढत आहे. नवनवीन अ‍ॅपमुळे शिक्षकांना शिकवण्यापेक्षा अ‍ॅपवर माहिती भरण्यातच वेळ जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याने काही संघटनांनी अ‍ॅपवर माहिती भरण्यास विरोध दर्शवला आहे. बहुतांश शाळा दुर्गम व खेडोपाड्यात आहेत, त्या ठिकाणी रेंज नसते. तसेच विविध अडचणीही आहेत.