राजापूर:- तालुक्यातील भालावली भंडारवाडा येथे झाडावर जमिनीपासून सुमारे वीस ते पंचवीस फुट अंतरावर चक्क बिबट्या अडकून पडल्याची घटना घडली. दरम्यान, वनविभागाच्या रेस्क्यू टिमने बिबट्याच्या शरीराभोवती अडकलेली फासकीची तार कापून बिबट्याची झाडावरून सुटका केली. सुटका होताच बिबट्याने जंगलामध्ये धाव घेतली. झाडावरून सुटका केलेला बिबट्या सुमारे एक ते दिड वर्ष वयाचा असून तो नर असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भालावली येथील पांडुरंग केळकर यांच्या बागेतील आंब्याच्या झाडावर जमिनीपासून सुमारे वीस फुट उंच अंतरावर तारेमध्ये अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. अमोल नार्वेकर यांच्यामार्फत माहिती मिळताच रत्नागिरी येथील परिक्षेत्र वन विभागाची टिम वन्यजीव पशुवैद्यक व पशुशल्य चिकित्सकांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता सकाळपासून बिबट्या झाडावर अडकून पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, रत्नागिरीच्या विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या रेस्क्यू टिमने तात्काळ बिबट्याची सोडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यामध्ये बिबट्याला झाडावरून खाली उतरवण्याचे आणि जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, त्यामध्ये सातत्याने अडथळे येत होते. त्यानंतरही बिबट्याची सुटका करण्याच्या रेस्क्यू टिमच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना शनिवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास बिबट्याभोवतीची अडकलेली फासकीची तार कापण्यात रेस्क्यू टिमला यश आले. त्यामुळे झाडावर अडकलेल्या बिबट्याची सुटका झाली.