सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रेयसीला भातगाव पुलावरून ढकलले

संगमेश्वर:- प्रेयसीला भातगाव येथील रम्य ठिकाणी फिरायला घेऊन जात तिच्या दागिन्यांची चोरी करीत तिला 22 फूट खोल असलेल्या भातगाव पुलावरून ढकलले आणि त्या ठिकाणाहून पोबारा केला. भातगाव पुलावर काम करणाऱ्या कामगारांनी तिला वाचवले. सदरची घटना संगमेश्वर तालुक्यातील भातगाव पुलावर बुधवार दि 22 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली

याबाबत सपना संदीप डिंगणकर (वय 34 वर्ष राहणार- पाणबुडी ता गुहागर) सध्या राहणार नालासोपारा मुंबई हिने संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की नितीन गणपत जोशी वय 27 वर्ष राहणार पाणबुडी सध्या राहणार नालासोपारा ठाणे या दोघांचे प्रेम संबंध होते ते गावाला पाणबुडी येथे आले होते . यादरम्यान नितीन जोशी याने प्रेयसी सपना डिंगणकर हिला भातगाव येथे फिरायला घेऊन गेला होता. यावेळी तिच्या अंगावरील दोन लाख 25 हजार सोन्याचे मंगळसूत्र, 50 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, 20 हजार रुपये किमतीचा कानातील टॉप, 20 हजार किमतीचे चार ग्रॅम कानातील सोन्याचे झुमके, 20 हजार रुपये किमतीचे साखळ्या, 30हजार रुपये किमतीचे सोन्याचे धातूच्या दोन अंगठ्या, 25हजार रुपये किमतीचे सोन्याच्या जातीचे गळ्यातील चेन, 10 हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या धातूचे दागिने असे एकूण रुपये चार लाख किमतीच्या सोन्याची दागिने चोरी करून सपना डिंगणकर ही बेसावध असताना त्याने तिला दोन्ही हाताने उचलून भातगाव ब्रिजच्या कठड्यावरून खाली 25 फूट पुलावरून ढकलून दिले आणि तेथून फरार झाला.
सदरची घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली . यावेळी पुलाजवळ काम करत असलेल्या कामगारांना सपना डिंगणकर हिने केलेली आरडाओरड ऐकण्यास आली त्यानंतर कामगारांनी त्या ठिकाणी धाव घेत तिला वाचवले. सदरची घटना समजल्या नंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सहकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम पंदेरे विनायक मानव यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली.
तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली तसेच घटनेची पाहणी केली .या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आले असून आरोपी नितीन गणपत जोशी यांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात बी एन एस 109/ 309 (6) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नागरगोजे करीत आहेत.