मिरजोळे-पाटीलवाडी येथे हातभट्टीवर पोलिसांचा छापा

४० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी:- मिरजोळे -पाटीलवाडी नदीकिनारी आणखीन एका गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत ४० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाहिद अली सोलकर (वय ३९, रा. सनराइज अपार्टमेंट, आझादनगर-कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २१) सकाळी पावणे अकराच्या सुमारास मिरजोळे-पाटील वाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी टाकलेल्या धाडीत संशयित विनापरवाना हातभट्टीची दारु बनविण्याच्या साहित्यासह तयार दारु जवळ बाळगलेल्या स्थितीत नदी किनारी सापडला त्यामध्ये ५ हजार ४५० रुपयाचे गुळ नवसागर मिश्रीत कुजके रसायन, ३० हजाराचे कुजके रसायन, तसेच २ हजार २०० रुपयांची गावठी दारु, २ हजाराचा डेग, ५०० रुपयांचा लाकडी चाटू असा ४० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.