मातोश्रीवरील बैठकीनंतरही रत्नागिरीतील उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम

रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचा निर्णय घेण्यासाठी सोमवारी मातोश्रीवर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत वैयक्तिक चर्चा केली. मात्र, या चर्चेनंतर देखील उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात रत्नागिरीतील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यावा याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी दोन्ही इच्छुक उमेदवार राजेंद्र महाडिक, उदय बने, किरण तोडणकर, संजय पुनसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय बने आणि राजेंद्र महाडिक हे इच्छुक उमेदवार आहेत. याशिवाय ऐनवेळी माजी आमदार बाळ माने हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून रत्नागिरी विधासभा मशाल चिन्हावर लढवू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मातोश्रीवर महत्वपूर्ण अशा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत वयक्तिक रित्या चर्चा केली. यावेळी पक्षातील निष्ठावंताला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. आपण द्याल तो उमेदवार निवडून आणू असा शब्द पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पुढील दोन दिवसात जाहीर केला जाईल असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.