जिल्ह्यातील मतदारसंघांची संख्या नऊवरून पाचवर

रत्नागिरी:- राज्यातील अन्य जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र विधानसभा मतदारसंघ न वाढता कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे. सन 1962 च्या काळात जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ होते. तथापी गेल्या काही वर्षात त्यामध्ये घट होऊन सन 2024 च्या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण मतदारसंघाची संख्या पाचवर येऊन ठेपली आहे.

या पूर्वी सन 1962 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात विधानसभेचेने एकूण मतदारसंघ नऊ होते. त्यामध्ये खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, माखजन (अ. ज.), संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर यांचा समावेश होता तर त्यानंतर 1967 ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माखजन मतदारसंघ कमी करण्यात आला आणि जिल्ह्यात आठ मतदारसंघ राहिले. 1972 च्या सार्वत्रिक निवडणुकीत आठ मतदारसंघ कायम राहिले. मात्र, 1978 च्या निवडणुकीत लांजा मतदारसंघ कमी करण्यात आला आणि जिल्ह्यात सात मतदारसंघ राहिले. त्यानंतर सन 1980, 1985, 1990, 1995, 1999, 2004 पर्यंत जिल्ह्यात सात मतदारसंघ राहिले. मात्र, 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत खेड आणि संगमेश्वर असे दोन मतदारसंघ कमी करण्यात आले आणि जिल्ह्यातील मतदारसंघाची संख्या घसरून पाचवर आली तेव्हापासून 2009,2014, 2019 आणि आता 2024 पर्यंत जिल्ह्यात पाच मतदारसंघ राहिले असून त्यांचा विस्तार वाढला आहे. मतदारसंघाच्या फेररचनेत महानगरांसह अनेक जिल्ह्यांत मतदारसंघाची संख्या वाढत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र, ती कमी होताना दिसत आहे. त्याला अनेक कारणे असल्याचे बोलले जात
आहे.