मिरजोळे-पाटीलवाडी येथे हातभट्टीवर कारवाईत १ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विनापरवाना हातभट्टी व्यवसायवर टाकलेल्या धाडीत १ लाख ८२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित चक्क दारु गाळत असताना पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मयुर रवी मोरे (वय ३८, रा. किर्तीनगर, कोकणनगर, मजगाव रोड रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १९) दुपारी पावणेदोनच्या सुमारास मिरजोळे- पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात निदर्शनास आली. जिल्ह्यात सध्या निव़़डणूक, आचारसंहिता या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने मटका, जुगार, अमली पदार्थ, गावठी दारु विक्री यावर करडी नजर ठेवली आहे. दोन दिवसापूर्वीच मिरजोळे येथे पोलिसांनी धाड टाकली होती. त्यानंतर पुन्हा मिळालेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास पुन्हा पोलिस पथकाने धाड टाकली. त्यावेळी संशयित चक्क दारु गाळत असताना रंगेहाथ सापडला.
मिरजोळे नदीकिनारी त्या जंगल भागात हातभट्टी व्यावसायाचे साहित्य व कुजके रसायन पोलिसांनी हस्तगत केले. त्यामध्ये १ लाख ७७ हजार ९५० रुपयांचे चार हजार ७५० लिटर कुचके रसायन, २ हजार २०० रुपयांची २० लिटर गावठी हातभट्टीची दारु, २ हजार रुपयांचा डेग, तसेच ५०० रुपयांचा लाकडी चाटू पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन डोमणे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.