पुढील चार दिवसात विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणार: बाळ माने

रत्नागिरी:-  रत्नागिरीकरांना बदल हवाय, ऐन दिवाळीत निवडणुकीच्या विजयाचे फटाकेदेखील फुटणार आहेत. परिवर्तनाचा वारा वाहू लागलाय. नेतृत्वबदल व्हायलाच पाहिजे, असे सांगत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी जनतेला साद घातली आहे. माझी भूमिका काय असावी? याबाबत प्रतिक्रिया जनतेने द्याव्यात, असे सांगून येत्या ४ दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती माने यांनी दिली. माने यांच्या या वक्तव्यावरुन स्वत: बाळ माने बंडाच्या तयारीत आहेत हे मात्र स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरीत महायुतीत अजून आलबेल पहायला मिळत नाही. ना. उदय सामंत हे भाजप आपल्यासोबत आहे हे सातत्याने सांगत आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांकडून मात्र तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र रत्नागिरीत निर्माण झाले आहे. त्यातच भाजपचे माजी आमदार बाळ माने हे सामंतांविरोधात शड्डू ठोकणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्या चर्चांना एकप्रकारे पुष्टीच पत्रकार परिषद घेऊन माने यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना बाळ माने पुढे म्हणाले की, विधानसभेची निवडणूक २० तारखेला आहे. तत्पुर्वी दिवाळी आहे. या दिवाळीत विजयाचे फटाके फुटणार आहेत. तर दुसरीकडे परिवर्तनाचा वारा वाहू लागला आहे. आपल्या सर्वांना विजयाच्या गुलालाची उधळण करायची असून या मतदारसंघाची मंत्रीपदाची परंपरा कायम ठेवायची आहे.

भाजप या निवडणुकीत महाविजय २०२४ हा संकल्प घेऊन राज्यात निवडणुकांना सामोरा जाणार आहे. मित्रपक्षात असलो तरी अद्याप कोणतेही निर्णय झालेले नाहीत. त्यातच रत्नागिरीकरांनादेखील बदल हवाय आणि या बदलाची चुणूक लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिली आहे, असे बाळ माने यांनी सांगितले.

बाळ माने सोमवारी एकटेच पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव खूप काही सांगून गेले. बाळ माने यांनी घेतलेली भूमिका आणि मतदारांना घातलेली साद यामुळे ते बंडाचे निशाण फडकावणार हे मात्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक कोणत्या पक्षातून लढवणार याबाबत मात्र सांगण्यास त्यांनी ‘वेट ऍण्ड वॉच’चा इशारा दिला आहे.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, मी म्हणेन ते धोरण आणि बांधेन ते तोरण अशी भूमिका गेल्या अडीच वर्षांत घेतली गेली. मित्रपक्षाचा विसर काहींना पडला होता. गळचेपी धोरण अवलंबलं गेलं. आता मात्र जनता याला खरोखरच कंटाळली आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना बाळ माने यांनी केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, राज्याची गुप्तचर यंत्रणा यासह जे खासगी सर्व्हे झाले ते सर्व्हे काय सांगतात? याची माहिती आमच्या नेत्यांपर्यंत देखील पोहोचली आहे. या सर्व्हेतून एकच पुढे आले की, या विधानसभा मतदारसंघात जनतेला बदल हवाय.

रत्नागिरीतील जनतेला साद घातलाना बाळ माने यांनी म्हटले की, मी आज जनतेला साद घालत आहे, मी राजकीय पक्षांशी संवाद साधत आहे. सर्वांचं मत एकच आहे की, बदल हवाय! आणि जर बदल हवा असेल तर कोणती भूमिका घ्यावी हे जनतेनेच मला सांगावे. सोशल मीडिया असेल व इतर माध्यमांतून आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात.

गेले अडीच वर्ष मित्रपक्ष असलेल्या भाजपला सातत्याने जाच केला गेला. हा जाच आता असह्य झाला, असे सांगून गट कधी पक्ष होऊ शकत नाही. पक्षाला स्वतंत्र एक घटना असते. आम्हाला रत्नागिरी वाचवायची आहे. विकसित रत्नागिरी करायची आहे. लोकसभेला याच मतदारसंघातून १० हजार मते कमी मिळाली. यात कुठली मैत्री आली? असा खोचक टोलादेखील त्यांनी लगावला.

मी जनतेच्या न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे २ दिवस मी प्रतिक्षा करतोय. त्यानंतर गुरुवारी मी माझी भूमिका स्पष्ट करेन. माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगून रत्नागिरीत महायुतीमध्ये बंडखोरी होणार याबाबत अप्रत्यक्ष संकेतच त्यांच्या पत्रकार परिषदेत मिळाले आहेत.